आव्हाना – आव्हाना सह परिसरातील शेतशिवारात आंब्याच्या झाडांवर यंदा भरघोस प्रमाणात मोहर पिक बाहारल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून हवामानातील बदल, अवकाळी पाऊस व कीडरोगांमुळे आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत होता. मात्र यंदा थंडीचा योग्य कालावधी, वेळेवर पडलेला पाऊस आणि सध्या पोषक वातावरण असल्यामुळे आंब्याच्या झाडांवर दर्जेदार व एकसारखा मोहर दिसून येत आहे.
आव्हाना, धाड, मालखेड, परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये केसर, बदामी, पायरी, देशी आंब्यांच्या झाडांना चांगला बहर आला असून फळधारणेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत सकारात्मक मानली जात आहे. योग्य काळजी घेतल्यास यंदा आंबा उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या शेतकरी मोहरावर रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि निगा राखण्यावर भर देत आहेत. मात्र अचानक अवकाळी पाऊस, गारपीट किंवा तापमानातील तीव्र चढ-उतार झाल्यास मोहर गळण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन व कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आंबा हे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन असून यंदा उत्पादन चांगले झाले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. व्यापारी, मजूर व वाहतूक क्षेत्रालाही याचा फायदा होणार असल्याचे चित्र आहे. एकूणच आव्हाना सह संपूर्ण परिसरात आंबा मोहर पिक बाहारल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी सुखकारक ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


























