सांगोला – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी शनिवार दि.२४ जानेवारी रोजी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक व दोन यांचे पहिले प्रशिक्षण स.१० ते सायं.५ वा.पर्यंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन व विद्यामंदिर प्रशाला सांगोला या ठिकाणी पूर्ण करण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी १३८० प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियमानुसार पार पाडावी यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत, समाधान वाघमोडे यांनी मतदान प्रक्रिया ईव्हीएम, व्हीव्हीपॅट हाताळणी, मतदार ओळख पडताळणी, आदर्श आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था राखणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ३२ झोनल अधिकारी उपस्थित होते. तसेच विद्यामंदिर प्रशाला सांगोला या ठिकाणी १४ वर्ग वर्गखोल्यामध्ये १४ झोनल ऑफिसर व मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी हॅन्डसाॅन मशीनचे ट्रेनिंग दिले. यावेळी तलाठी, महसूल सेवक उपस्थित होते अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.























