सोलापूर – विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट होतो. वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी केले.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी माने बोलत होते. हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी मिळालेले हे व्यासपीठ म्हणजे त्यांच्यासाठी आनंदोत्सवच असून त्यांच्या कलागुणांना नवी दिशा मिळते, असेही माने यांनी नमूद केले.
यावेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तेजस्वी कार्याचा व जाज्वल देशभक्तीचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी नेताजींच्या देशसेवा, देशनिष्ठा व बलिदानाची आठवण करून देत, त्या मूल्यांचे आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचेही यावेळी विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार होत्या. प्रारंभी तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच स्व. बसवराज कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख स्वप्नील चाबुकस्वार, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, रेवणसिद्ध रोडगीकर, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार , मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष राजशेखर घंटे, सहसचिवा वैशाली अभंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, सेवानिवृत्त शिक्षक धर्मराज बळ्ळारी, लक्ष्मीकांत त्रिशुले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी अहवाल वाचनाद्वारे शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. स्नेहसंमेलनात पाचवी ते नववी इयत्तेतील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी गणेश गीत, शिव तांडव नृत्य, तेलुगू गीत, देशभक्तीपर गीत, छावा, कृष्ण जन्माला, तमिळ नृत्य, गोंधळ गीत, वाघ्या-मुरळी खंडोबा गीत, महाकाली दर्शन – देवी महिमा अशा विविध गीतांवर सादर केलेल्या नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची दाद मिळवली व पालकांकडून भरभरून वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वराध्य मठपती यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन उमादेवी कुंभार यांनी केले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





















