सोलापूर : येथील सोलापूर सोशल असोसिएशन या संस्थेच्या वादात संस्थेचे चेअरमन डॉ. अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्षपदाच्या मान्यतेस स्थगिती मिळावी अशी मागणी करणारा अर्ज मा. धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे राहुल मामू यांनी नुकताच फेटाळून लावलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, सोलापूरातील अल्पसंख्याक मुस्लीम धर्मीयांची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली सोलापूर सोशल असोसिएशन या संस्थेत मोठे वाद चालू होता. संस्थेमार्फत सोलापूरात बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंतचे अनेक शैक्षणिक प्रकल्प राबविले जातात. विद्यार्थी संख्या सुमारे १०,००० पेक्षा जास्त आहे, तर कर्मचार्यांची संख्या सुमारे २५० पेक्षा जास्त आहे. डॉ. अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाचा बदल अहवाल क‘. ६७०/२०१२ हा तत्कालीन मा. धर्मादाय उप आयुक्त मा. श्री. प्रविण कुंभोजकर साहेब (दिवाणी न्यायाधीश) यांनी मंजूर केला होता. या निर्णयास आव्हान देणारे अपिल क‘. ५०/२०२५ आणि ५४/२०२५ हे श्री. अलताफ जमादार आणि श्री. फारुक कमिशनर यांनी दाखल केले होते.
डॉ. अखलाक अहमद वडवान हे संस्थेचे सभासद नाहीत, त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार नाही, त्यांची निवड बेकायदेशीर आहे, सभासद बोगस आहेत, निवडणूक झालीच नाही अशा स्वरुपाचे आक्षेप या दोघांनी पुणे येथील कोर्टात उपस्थित करुन हरकती नोंदविल्या होत्या.
संस्थेमार्फत चालविल्या जाणार्या शैक्षणिक उपक्रमातील शिक्षक व कर्मचार्यांच्या भरती प्रक्रियेस देखील रियाज खरादी, अलताफ जमादार आणि फारुक कमिशनर यांनी शिक्षण खात्याकडे असंख्य तक्रारी दाखल करुन या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी केली होती. संस्था संचलित शाळेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांच्या नियुक्त्यांना देखील आक्षेप घेतले होते. संस्थेच्या वादात शिक्षकांच्या विरुध्द सातत्याने केल्या जात असलेल्या तक्रारीची माहिती पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयास देण्यात आली होती.
तक्रारदारांपैकी रियाज खरादी हे कोणत्याही प्रकारचे सभासद नाहीत. तसेच फारुक कमिशनर आणि अलताफ जमादार यांनी सतत बोगस तक्रारी करुन संस्थेस बदनाम करण्याचे व सुरळीत चाललेले काम थांबविण्याचे प्रयत्न केले. या बाबी मा. धर्मादाय आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारदारांचे सर्व आक्षेप हे केवळ विरोधासाठी विरोध आहेत. या आक्षेपांना कागदोपत्री कोणताही आधार नाही. त्याचप्रमाणे अत्यंत सुरळीत चाललेल्या व्यवस्थापनामध्ये केवळ व्यक्ती व्देषापोटी हरकती आणण्याचा उद्योग केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची बाब देखील निदर्शनास आणून दिली. अल्पसंख्याक मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिताकरीता स्थापन केलेल्या या संस्थेतील हा वाद समाजाचे नुकसान करणारा आहे, ही बाब देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेवून मा. धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी डॉ. अखलाक वडवान यांच्या कार्यकारणी विरुध्द मागितलेली स्थगिती फेटाळण्याचा आदेश पारीत केला.
याकामी डॉ. अखलाक वडवान व इतर यांच्याकडून अॅड. नितीन हबीब, अॅड. रमेश रोडगी, अॅड. रोहित हबीब आणि अॅड. अब्दुल जब्बार शेख (माजी मुख्याध्यापक ) यांनी काम पाहिले. तर अलताफ जमादार आणि फारुक कमिशनर यांच्यावतीने अॅड. एस.आर. मुंढे आणि अॅड. ए. आर. रायनी यांनी काम पाहिले.























