बार्शी – समाजात आजही विधवा महिलांना मंगल कार्यांपासून दूर ठेवण्याच्या अनिष्ट प्रथा अस्तित्वात असताना, बार्शी तालुक्यातील सारोळे येथे ‘एकता महिला मंच’ ने या जुनाट परंपरांना छेद देणारा एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून ‘मी विधवा नव्हे, मी स्त्री’ या अभिनव उपक्रमांतर्गत सुहासिनी आणि विधवा भगिनींचा एकत्रित हळदी-कुंकू सोहळा बुधवारी (24 जानेवारी २०२६) मोठ्या उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात संपन्न झाला.
सावित्रीच्या लेकींकडून नव्या परंपरेचा श्रीगणेशा
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच अमरजा बाळराजे गाटे,सरपंच सुवर्णा काकडे, एकता महिला मंच प्रमुख प्रभाकर क्षीरसागर,एकता महिला मंच भांडेगाव प्रमुख स्वाती शिंदे, प्रभावती साबळे, पूजा भोसले, गीता पाटील, स्वाती चौधरी, आणि यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की, “पतीच्या निधनानंतर स्त्रीचे अस्तित्व संपत नाही. तिला समाजात सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ‘विधवा’ हा शब्द पुसून काढून ‘मी एक स्त्री आहे’ हा स्वाभिमान जागवण्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.”
खेळ, उखाणे आणि आनंदाची उधळण
केवळ भाषणे न ठेवता महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विधवा आणि सुवासिनी महिलांनी मिळून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
उखाणे स्पर्धा: महिलांनी एकापेक्षा एक सरस उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली.
प्रथम क्रमांक: दमयंती कुलकर्णी
द्वितीय क्रमांक: कविता पाटील
तृतीय क्रमांक: शालन चौधरी
संगीत खुर्ची: या खेळात महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
प्रथम क्रमांक: भाग्यश्री गाटे
द्वितीय क्रमांक: प्रिया गाटे
तृतीय क्रमांक: सुजाता गाटे
विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक परिवर्तनाचा ‘मैलचा दगड’
कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण तो होता, जेव्हा सुवासिनी आणि विधवा भगिनींनी एकमेकींना सन्मानाने हळदी-कुंकू लावले आणि तिळगुळ देऊन नव्या नात्याची व परंपरेची सुरुवात केली.


























