सोलापूर : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी रविवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मराठी सिनेसृष्टीत स्टायलिश मांडणी, आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक नवी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ती ‘रुबाब’ या चित्रपटाच्या रूपात. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ प्रेमकथा नसून, स्वतःची ओळख जपणाऱ्या, आत्मसन्मानाने जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट आहे. संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांची फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.
जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाला चिनार-महेश यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे. तर चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ हे गाणं जल्लोष, पार्टी आणि उत्सवाचा नवा ट्रेंड ठरणार आहे. नकाश अजीज आणि सोनाली सोनवणे यांच्या जोशपूर्ण गायकीतून हे गाणे प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये रंग भरणार आहे. नुकतच आलेलं रोमँटिक गाणं ‘मन जुळले’ प्रेमातील भावनिक जवळीक, विश्वास आणि नितळ नात्याचा स्पर्श अनुभवायला लावते. केतकी माटेगावकरच्या सुमधुर आवाजामुळे हे गाणं प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज ठरत आहे.
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. डॉ. प्रमोद काळे अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत.
या पत्रकार परिषदेला संभाजी ससाणे, शीतल पाटील,डॉ. प्रमोद काळे उपस्थित होते.
———————————————-
























