सोलापूर – शास्त्रीय गायन क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल उमरगा येथील सुपुत्र आणि सोलापूरच्या सेवासदन कन्या प्रशालेचे संगीत शिक्षक विलास कुलकर्णी यांना उत्तर प्रदेश येथील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठा’तर्फे ‘विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान’ जाहीर करण्यात आली आहे.
भगवान श्रीकृष्ण आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मस्थान असलेल्या मथुरा येथील या विद्यापीठाने नुकतीच ही घोषणा केली. विद्यापीठाचे कुलपती इंदु भूषण मिश्रा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हिंदी भाषा, साहित्य आणि कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी हे विद्यापीठ जगभरात प्रसिद्ध आहे.
येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय हिंदी चर्चासत्र आणि सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्यात विलास कुलकर्णी यांच्या शिक्षण, पात्रता आणि शास्त्रीय गायन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाने हिंदी लेखक, साहित्यिक, कलावंत आणि अभ्यासकांसाठी ‘सारस्वत सन्मान’, ‘साहित्य भूषण’ आणि ‘विद्या वाचस्पती’ यांसारख्या उच्च श्रेणीतील पुरस्कारांची परंपरा सुरू केली आहे. विलास कुलकर्णी यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या विशेष सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
”शास्त्रीय गायनासारख्या पवित्र कलेची सेवा करताना मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद आणि सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा विजय आहे.” असे विलास कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
























