सोलापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रा.स्व.संघ, सोलापूर पंचमुर्ती नगर, केशव नगर व क्रीडा-भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात भव्य दिव्य तिरंगा मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. हिरा मोती चौक, जुना विडी घरकुल परिसरात सकाळी ७:०० वाजता या रॅलीस उत्साहात सुरुवात झाली. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्हा संघचालक सुनील इंगळे, बीएसएफ जवान युवराज कोंतम, क्रीडा भारतीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अरुण उपाध्ये, नूतन नगरसेवक प्रथमेश कोठे, अजय पोन्नम, सतीश शिरसील्ला यांच्यासह संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या तिरंगा मॅरेथॉन रॅलीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशभक्ती, शिस्त आणि संघभावना वृद्धिंगत करणे, तसेच युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ एक ऐतिहासिक टप्पा नसून राष्ट्रसेवेच्या अखंड, मूल्यनिष्ठ आणि समर्पित प्रवासाचा गौरवशाली उत्सव आहे. संघसंस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांनी समाजाचे संघटन करून चारित्र्यसंपन्न, शिस्तबद्ध व राष्ट्रनिष्ठ नागरिक घडवण्याचे ध्येय ठेवले होते. “शरीराने सक्षम, मनाने सुसंस्कृत आणि राष्ट्रासाठी समर्पित नागरिक” घडवण्याचा विचार संघाच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येतो.
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले, तर विजेत्यांना ट्रॉफी व आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली. आरोग्य, एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन संघाच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा अभिमानाचा भाग ठरली.
चौकट : मॅरेथॉनमध्ये सहभागी खेळाडू
गट १: वय १४ ते २० (पुरुष)
गट २: वय २१ ते खुला गट (पुरुष)
गट ३: महिला व विद्यार्थी
एकूण सहभागी : ६८४
चौकट : मॅरेथॉनचे विजेते
गट १:
प्रथम – राहुल गिरप्पा अस्वले
द्वितीय – कृष्णा अंबादास लोंडे
तृतीय – सुशांत दत्तात्रय लोंडे
गट २:
प्रथम – अनुष भास्कर चिलका
द्वितीय – प्रतीक शशिकांत शिंदे
तृतीय – श्रीराम नवनाथ बंडगर
गट ३:
प्रथम – श्रद्धा केशव गुंतुक
द्वितीय – तनवी आनंद जगणकर
तृतीय – तृप्ती श्रीनिवास कोंडा
चौकट : विशेष प्राविण्य
रुद्र राहुल माने (वय – ६ वर्षे)


























