सोलापूर – प्रभाग क्र. ०८ मधील नागरी समस्यांचे दैनंदिन स्वरूपात निराकरण करण्यासाठी नगरसेवक गौरीशंकर ऊर्फ प्रविण दर्गोपाटील यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने सकाळच्या सुमारास विणकर उद्यानात प्रभाग फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीदरम्यान नगरसेवक दर्गोपाटील यांनी वॉकिंग ग्रुपचे सदस्य व स्थानिक नागरिकांसह उद्यानातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीमध्ये उद्यानातील पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी, स्वच्छतेचा अभाव, विद्युत व्यवस्थेतील त्रुटी, उद्यानात पडून असलेले जुने बाद व अनावश्यक स्क्रॅप साहित्य तसेच काही ठिकाणी वॉकिंग ट्रॅकवरील असमतोल व धोकादायक भाग निदर्शनास आले. सदर समस्यांची उद्यानातील माळी व बाग रक्षकांच्या उपस्थितीत सखोल चर्चा व पाहणी करण्यात आली.
समस्या लक्षात येताच नगरसेवक दर्गोपाटील यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. उद्यान विभाग, विद्युत विभाग, सहाय्यक अभियंता, अवेक्षक आदी अधिकाऱ्यांना सूचना देत समस्यांचे त्वरित निराकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. विविध विभागांमध्ये समन्वय साधून तातडीची कार्यवाही सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
नगरसेवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे व कार्यक्षमतेमुळे वॉकिंग ग्रुपचे सदस्य व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभागातील नागरी समस्यांचे दैनंदिन पातळीवर निराकरण करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या नियमित पाहणीमुळे परिसरातील सुविधा अधिक सक्षम होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.























