अंबड : हंस फाउंडेशनच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर घुंगर्डे हादगाव येथील मारुती मंदिर परिसरात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या रक्तदान शिबिरास गावातील तसेच परिसरातील अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
या शिबिरात युवकांसह विविध वयोगटांतील नागरिकांनी सहभाग नोंदवला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून त्यामुळे गरजू व गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतात, ही सामाजिक जाणीव ठेवून नागरिकांनी पुढाकार घेतला. शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागात रक्तदानाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली. हंस फाउंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर सातत्याने कार्यरत आहे.
समाजातील गोरगरीब, वंचित, अनाथ व निराधार घटकांसाठी संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. आरोग्य शिक्षण, सामाजिक उपक्रम व जनजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य संस्थेकडून केले जाते. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले. भविष्यातही अशा लोकहिताच्या व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे हंस फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी मत्स्योदरी शाळेचे मुख्याध्यापक कल्याणजी सोळुंके सर, अंबरसिंग परिहार, रामसिंग पवार, सचिन पवार, पवन परिहार, कृष्णा परीहार, करण पवार, कौसर भाई पठाण, संतोष काकडे, रवी भद्रे, विश्वजीत परिहार, रणजीत परिहार, रघुनाथ भद्रे, शशिकांत पांढरे, परमेश्वर पवार, अभिनय मोतेकर, शरद परिहार, बापू मस्के, माऊली काळे, आकाश पवार, चरणसिंग पवार, ज्ञानेश्वर नांद्रे, माऊली दोबोले, हनुमान परिहार तसेच जनकल्याण रक्तपेढीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


























