सोलापूर : “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, वाणिज्य संशोधनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा शोध घेतला पाहिजे. स्थानिक गरजा आणि समस्यांमधूनच तुम्हाला उत्कृष्ट व्यवसायाच्या कल्पना (Business Ideas) सुचतील आणि त्यातूनच यशस्वी उद्योजक घडतील,” असे मौलिक विचार सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक अमितकुमार जैन यांनी मांडले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर सोशल असोसिएशनचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वाणिज्य, व्यवस्थापन आणि उद्योजकता मधील संशोधन” या विषयावर आयोजित एकदिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन अमितकुमार जैन आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद के. चिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी होते तर स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजक व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी केले.
इनक्युबेशन सेंटरची साथ: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. देवानंद चिलवंत म्हणाले की, “आजच्या काळात नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना जर तुमच्याकडे एखादी भक्कम व्यवसायाची कल्पना (Strong Business Idea) असेल, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे ‘इनक्युबेशन सेंटर’ तुम्हाला स्टार्टअप सुरू करण्यासाठी जागा, मार्गदर्शन आणि अर्थसहाय्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल.”
या कार्यशाळेत सोलापूर विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमधील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील ज्या प्राध्यापकांनी पीएचडी (Ph.D.) पूर्ण केली तसेच ज्यांना प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली, अशा शिक्षकांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यशाळेच्या बीजभाषण सत्रात डी.ए.व्ही. वेलणकर कॉलेजचे डॉ. सुनील एस. पाटील यांनी ‘वाणिज्य व व्यवस्थापनातील संशोधन पद्धती’ (Research Methodology in Commerce and Management) या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांतून एकूण ११३ जणांनी सहभाग नोंदवला. दोन वेगवेगळ्या तांत्रिक सत्रांमध्ये मिळून ५२ विद्यार्थ्यांनी आपापले संशोधन पेपर (Research Papers) सादर केले. या सत्रांचे परीक्षण डीएसजी कॉलेज, मोहोळचे डॉ. सुनील मोरे आणि संगमेश्वर महाविद्यालयाच्या डॉ. संगीता कामत यांनी केले. दोन्ही सत्रांतील उत्कृष्ट शोधनिबंधास पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यशाळेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ डी.बी.एफ. दयानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व पटवून दिले व भावी संशोधन कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रथम सत्रातील उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण पुरस्कार- प्रथम क्रमांक- एच. एन. कॉलेज सोलापूर, द्वितीय क्रमांक- लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, तृतीय क्रमांक, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. उत्तेजनार्थ-गरड महाविद्यालय मोहोळ, उत्तेजनार्थ- संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रुप.
द्वितीय सत्रातील उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण पुरस्कार- प्रथम क्रमांक सोशल महाविद्यालय, सोलापूर, द्वितीय क्रमांक- शिवदारे महाविद्यालय सोलापुर, तृतीय क्रमांक- सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट. उत्तेजनार्थ- सांगोला महाविद्यालय सांगोला, उत्तेजनार्थ-ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापुर.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला, डॉ. टी. बी. लडाफ, श्री. एम. फारूक शेख तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


























