सोलापूर – जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगून ४४ महिलांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा गैरवापर करत बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित महिलांची बांधकाम कामगार म्हणून मंडळामध्ये नोंदणी झालेली असल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच ए- ०५ वैद्यकीय पदवी या योजनेअंतर्गत त्यांच्या पाल्यांच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाल्याची नोंद आढळून आली आहे. मात्र, या नोंदणीसाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विभागातील नोंदणी अधिकाऱ्यांनी संबंधित लाभार्थ्यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, लाभार्थ्यांनी येत्या २३ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, कामगार कल्याण भवन, दमाणी नगर, सोलापूर येथे आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.ठरलेल्या तारखेला हजर न राहिल्यास किंवा कागदपत्रे बोगस आढळून आल्यास संबंधितांवर स्थानिक पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव येथील सुमारे ४४ महिलांची शासकीय शिष्यवृत्ती योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दमाणी नगर येथील सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेल्या महिलांनी आमच्यासोबत आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून त्याचा लाभ मिळवून देतो, असे सांगून गावात येणाऱ्या एजंटांनी त्यांच्याकडून आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकसह इतर आवश्यक कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांच्या आधारे योजना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
महिलांकडून काही ठराविक रक्कम तात्पुरती देण्यात आली. मात्र त्यांच्या नावावर सुमारे दीड लाख रुपयांचा आर्थिक बोजा दाखवण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या प्रमाणात रक्कम देण्यात आली असली, तरी मोठी रक्कम एजंटांनी स्वतःकडेच ठेवून ते पसार झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
चपळगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये हे एजंट नियमितपणे येत होते आणि सर्व महिलांची कागदपत्रे एकत्रितपणे गोळा करून नेत होते. महिलांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न देता त्यांच्या नावावर मोठ्या रकमेची नोंद करण्यात आल्याने आता त्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाने संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू केली आहे. फसवणुकीमागे कोण आहे, किती महिलांना याचा फटका बसला आहे आणि आर्थिक गैरव्यवहार किती आहे, याचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चपळगाव येथील महिलांनी दमानी नगर येथील सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयात सकाळी एकच गर्दी केली होती. महिलांनी खरी वस्तुस्थिती अधिकाऱ्यांसमोर सांगितली. त्यावर अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगताना बांधकाम कामगार योजनेमध्ये सुमारे २०० जणांच्या नावे बोगसगिरी झाली असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





















