सोलापूर – नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्यानंतर सोलापुरात या घटनेचे पडसाद उमटले. आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी महाजन यांच्या विरोधात सोलापुरात एकच आक्रोश केला.
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करत मंत्री महाजन यांच्या पोस्टला जोडे मारले. तसेच त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घातला. तर दुसरीकडे सोलापुरात कडवट भीमसैनिकांनी बाबासाहेबांच्या घोषणा देत मंत्री महाजन यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन करत पोस्टर जाळले.
दरम्यान, भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानाची निर्मिती केली. तसेच संविधान देशाला सुपूर्द केले. त्या दिवशीच मंत्री महाजन बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. अशा मंत्र्यांना सोलापुरात फिरू देणार नाही. आमचा जीव गेला तरी बेहत्तर परंतु बाबासाहेबांचे नाव कायम ठेवण्यासाठी आंदोलन करत राहू असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टीचे रोहित खिलारे आणि मिथुन लोखंडे यांनी दिला. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या रोहित खिलारे,मिथुन लोखंडे,युवराज कांबळे, शंभू पवार, वैभव शिंदे, आदींसह कडवट भीमसैनिकांची उपस्थिती होती.
सोलापूर शहरातील कडवट भीमसैनिकांनी मंत्री महाजन यांच्या पोस्टरवर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मंत्री महाजनांचे पोस्टरला जोडेमार आंदोलन करत ते पोस्टर जाळून फाडले.





















