सोलापूर – प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुटी आणि मंगळवारी ऑल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनामुळे बँका बंद होत्या. बाळीवेस येथील एसबीआयच्या मुख्य शाखेमध्ये बँक संप बाबत फलक लावण्यात आला होता. बँक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर दुसरीकडे एटीएम सेंटरमध्ये देखील पैशांचा तुटवडा जाणवला.
दरम्यान, चौथा शनिवार, रविवार, सोमवार (प्रजासत्ताक दिन) आणि मंगळवार (बँक कर्मचाऱ्यांचा संप) असा हा कालावधी असल्याने ग्राहकांच्या बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बँका बंद राहिल्यामुळे रोख रकमेची गरज भासणाऱ्या ग्राहकांची गैरसोय झाली आहे. विशेषतः सलग चार दिवसांचा कालावधी लक्षात घेता एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, या काळात नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, एटीएम व इतर ऑनलाइन सेवा सुरू राहणार असल्याचे बँक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी अत्यावश्यक व्यवहार वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमचा देशव्यापी बंद हा ग्राहकांची गैरसोय व्हावी, हा आमचा उद्देश नाही. उलट ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठीच हा लढा आहे, असे युनियनच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकांनीही या आंदोलनाला समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन युनियनकडून करण्यात आले आहे.
या आहेत मागण्या
ऑल इंडिया एम्प्लॉइज युनियनने मंगळवारी ‘बँक बंद’चा निर्णय घेतला आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, राष्ट्रीयीकृत बँकांमधून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त होत असतानाही नवीन भरती न झाल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा ताण कमी करावा, तसेच ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार बँक कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.





















