देगलूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देगलूर नगरपरिषदेच्या वतीने नगर परिषदेची इमारत, राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक आणि पोलीस स्टेशनसमोरील स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांवर रोषणाई करण्यात आली परंतु स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांवर अक्षरशः कुत्र्याचा संचार होत आहे. या स्मारकावरील एकूण सात पथदिव्यांपैकी तीन बंद पथदिवे तर तीन ठिकाणी पथदिवेच नाहीत केवळ एकच पथदिवा चालू आहे. या परिस्थितीवरुन स्मारकांची शायनिंग आहे. पण सन्मान नाही! अशीच दैयनीय परिस्थिती पहावयास मिळत आहे.
देगलूर शहरातील पोलीस स्टेशनसमोरील स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारक, शहिद अब्दुल हमीद स्मारक आणि या स्मारकांवर मोकाट कुत्र्यांचा संचार होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. विशेषतः लाखो रुपयांची स्मारके उभारली परंतु या स्मारकांना दरवाजे नसल्याने अक्षरशः कुत्र्याचा संचार होत आहे. तर कॅप्टन डॉ. मनोज काशिनाथ अप्पा दयाडे या स्मारकाचे लोखंडी कम्पाऊंड कमी उंचीचे असल्याने येथेही कुत्र्याचे संचार होत असल्याचे दिसून आले आहे. देगलूर शहरातील पोलीस स्टेशनसमोरील स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला रंगीत लाइटिंग लावून झगमगाट करण्यात आला. बाह्य रोषणाईने स्मारक उजळले असले, तरी प्रत्यक्षात मात्र या स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे वास्तव समोर येत आहे.
या स्मारक परिसरात असलेल्या तब्बल सात पथदिव्यांपैकी केवळ एकच पथदिवा सुरू आहे. उर्वरित तीन दिवे बंद अवस्थेत असून, तीन ठिकाणी तर पथदिवेच नाहीत. परिणामी वर्षभर या स्मारकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळते. केवळ एखाद्या राष्ट्रीय दिनापुरतीच रोषणाई करून ‘शायनिंग’ दाखवणे योग्य आहे का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, या स्मारकाला संरक्षणासाठी दरवाजा नसल्याने येथे मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, घाण आणि दुर्गंधी पसरलेली असून स्मारकाच्या पवित्रतेला गालबोट लागले आहे. शहीद जवानांच्या स्मृती जपण्याऐवजी त्यांच्या स्मारकाची ही अवस्था अत्यंत वेदनादायक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक, नगरपरिषद इमारत तसेच पोलीस स्टेशनसमोरील स्मारकावर करण्यात आलेली रोषणाई ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. मात्र ही रोषणाई कायमस्वरूपी असणे, पथदिवे दुरुस्त करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि मोकाट कुत्र्यांवर बंदोबस्त करणे ही तितकीच आवश्यक बाब आहे. फक्त एक दिवसाचा झगमगाट नव्हे, तर वर्षभर सन्मान जपला गेला, तरच स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या आणि देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांप्रती खऱ्या अर्थाने आदर व्यक्त झाल्याचे मानले जाईल, अशी ठाम भूमिका आता देगलूरच्या सजग नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.























