सोलापूर – मुळेगाव व मोहळकर तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे करिता त्यांना शिलाईचा व्यवसाय ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत सुरू करून देण्यात आला. महिलांना शिलाई केंद्रासाठी आणखी शिलाई मशीनची आवश्यकता असल्याने तेथील महिलांनी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी मुळेगाव तांडा व मोहळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना 26 अत्याधुनिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण जिल्ह्यात चौकशी अवैध गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या इसम व त्यांना मदत करणाऱ्या महिलांना अवैध गावठी दारूच्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांचे करिता स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना इतर व्यवसाय सुरू करण्याकरिता उपाय योजना राबवून चौकशी अवैध हातभट्टी दारू व्यवसायाकडे आकर्षित होऊ नये या करिता अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल प्रयत्न करीत आहेत.
यावेळी प्रीतम यादवकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व बोऱामणी दुरक्षेत्र कडील पोलीस अमलदार उपस्थित होते.
शिलाई मशीन उपलब्ध करून देणे करिता संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण, राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी प्रयत्न केले आहेत.

























