सांगोला – जि.प व पं.स सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी सांगोला तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी परवाना कामकाज सुरू करण्यात आले असून सभा, मिरवणूक, प्रचार, वाहन ध्वनी दर्शक फलक, पोस्टर बॅनर, हेलिपॅड, व्हिडिओ शूटिंग इत्यादीसाठी परवानगी फक्त एक खिडकी कक्षामार्फत देणे बंधनकारक राहील अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली.
अर्ज देताना ४८ तास आधी सादर करावा. अर्जात दिनांक, वेळ, ठिकाण, कार्यक्रमाचा प्रकार, सहभागी संख्या, वाहन क्रमांक, ध्वनी वर्धक तपशील, उमेदवाराचे ओळखपत्राची प्रत जोडून अर्ज सादर करावा अशी माहिती एक खिडकी नोडल अधिकारी सोमनाथ साळुंखे यांनी दिली. एक खिडकी परवाना मध्ये वाहन परवाना देणेसाठी अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहन निरीक्षक संदीप पाटील यांची तसेच सभेसाठी परवानगी व स्पीकर परवानगी देण्यासाठी पीएसआय संजय बागडे यांची नियुक्ती केलेली असून त्यांच्यासोबत सांगोला नगरपालिकेच्या कर अधिकारी अस्मिता निकम, तहसील कार्यालयाचे संपतराव पाटील, पंचायत समितीचे अविनाश आवारे इत्यादी टीम उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.
आदर्श आचारसंहितेच्या अधीन राहून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य करू नये, धार्मिक जातीय द्वेषपूर्ण भडक भाषणे करू नयेत. ध्वनीवर्धक वापरण्यासाठी वेळ स.८ ते रा.१० पर्यंत पालन करणे बंधनकारक आहे. तसेच शासकीय मालमत्तेचा शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळे या परिसरात नियमाचे काटेकोर पालन करावे, प्रचाराचा शेवटचा दिवस ५ फेब्रुवारी रोजी रा.१० वाजेपर्यंत राहील.
– बी.आर.माळी, निवडणूक निर्णय अधिकारी

























