सोलापूर : विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली. येथील पत्रा शेड आणि खोके जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशित करण्यात आली.
विजापूर रोडवरील आयटीआयच्या संरक्षण भिंती लगत परिसरात रस्त्यावर हातगाड्या, टपऱ्या, फलक तसेच बांधकाम साहित्य ठेवल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने ही कारवाई हाती घेतली. कारवाईदरम्यान रस्त्यावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. आयटीआयजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेले चार खोके, दोन लोखंडे छत निष्काशीत करण्यात आले, असे महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे विजापूर रोडवरील वाहतूक सुरळीत झाली असून पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले असून अशा प्रकारची सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.
शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नियमांचे उल्लंघन करून पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.
























