नायगांव – तालुक्यातील घुंगराळा येथील तिर्थक्षेत्र खंडोबा मंदिराच्या जिर्णोद्धार, मूर्ती स्थापना,कलश रोहणाचा वर्धापन दिनानिमित्त दि.१ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत खंडोबा मंदिरात भव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून, यासप्ताहामुळे घुंगराळासह पंचक्रोशीतील गावातील भाविक भक्त मंडळी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहेत.
राज्यातील नामवंत प्रभावी कीर्तनकारांच्या सुमधुर वाणीतून संत परंपरेचा जागर, समाजप्रबोधन, अध्यात्म व संस्कार यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार असून, हरिनामाच्या गजराने घुंगराळा नगरी अक्षरशः दुमदुमून जाणार आहे.
या भक्तिमय सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरती, मल्हारी सप्तशती पारायण,गाथा भजन, हरिपाठ, तर सायंकाळी रात्री ८:३० वाजता कीर्तन व त्यानंतर खंडोबा जागरण असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.येथील खंडोबाच्या व्दारी सप्ताहाभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभणार आहे.
नामवंत कीर्तन कारणांची कीर्तन सेवेची रुपरेषा.
दि. १ फेब्रु.रोज रविवारी ,ह.भ.प. मधुसूदन महाराज कापशीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाचा मंगल प्रारंभ होणार आहे.दि. २ फेब्रु. रोज सोमवार ह.भ.प. विलास महाराज गजगे (बोथी, गगाखेड),दि.३ फेब्रु. रोज मंगळवार ह.भ.प. संतोष महाराज वणवे (बीड),दि.४ फेब्रु.रोज बुधवार वाणी भूषण ह.भ. प. सौ. सोनाली ताई फडके (कानगाव, ता. दौंड),यांच्या प्रभावी कीर्तनातून संतविचारांचा जागर होणार आहे. दि. ५.फेब्रु.रोज गुरुवारी बाल कीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज जाहुरकर,दि. ६ फेब्रु.रोज शुक्रवार सुमधुर वाणीचे ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणेकर) यांची विशेष कीर्तनसेवा संपन्न होणार आहे.
दि. ७ फेब्रु. रोज शनिवारी ह.भ.प.वनिताताई यांचे प्रवचन.दि. ८ फेब्रु. रोज रविवारी सकाळी १० ते १२ ह.भ.प. भागवताचार्य सचिन महाराज ढोले (संभाजीनगर),यांच्या काल्या च्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता होणार आहे.
संपूर्ण सप्ताहात भक्ती, सेवा व महाप्रसादाचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार असून, हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी घुंगराळा येथील सकल ग्रामस्थ,मंदिर समिती, तरुण मंडळ, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.या माध्यमातून धार्मिक ऐक्य,सामाजिक सलोख्याचे दर्शन घडणार आहे.
या पवित्र धार्मिक सोहळ्याचा घुंगराळा नगरीसह सबंध नायगांव तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह संयोजन समिती, मंदिर समिती व समस्त ग्रामस्थां च्या वतीने करण्यात आले आहे.
























