अर्धापूर – शहरातील रस्त्यावर ट्रॅक्टर आणि तहसीलदार यांच्या शासकीय वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज घडली. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले असून, सेवक शेख सलीम यांचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून ट्रॅक्टर जात असताना समोर अचानक एक दुचाकी आली. या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालकाने अचानक वळण घेतले. यावेळी ट्रॅक्टरचा दुभाजकाला धक्का लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विरुद्ध दिशेला आला. त्याच वेळी समोरून तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे शासकीय वाहन येत होते. ट्रॅक्टर व तहसीलदारांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघाताच्या वेळी गाडीमध्ये तहसीलदार रेणुकादास देवणीकर, चालक अरुण वाघमारे आणि सेवक शेख सलीम हे प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ.आनंद शिंदे, सापोनी विष्णुपंत कराळे,संतोष काळे,विजय आडे,गजानन भालेराव,चंद्रकांत फुलकुंडवार, संभाजी गोहरकर, महादेव डुकरे,शेख फेरोज , उपस्थित सर्वांनी तत्काळ मदत कार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.






















