पंढरपूर – विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेल्या लोखो वैष्णवांनी माघी एकादशीचा सोहळा डोळे भरुन अनुभवला. पंढरीसी येवोनिया आता .. धन्य झालो पंढरीनाथा या उक्ती प्रमाणे पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या भेटीला येण्याची मनोमन इच्छा व्यक्त करुन मोठ्या जड अंत:करणाने भाविक आज पंढरीचा निरोप घेत होते. येथील बसस्थानकावर तसेच रेल्वेस्थानकावर पहाटे पासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी गर्दी झालेली होती.
दरम्यान एकादशी दिवशी रात्रभर शहर आणि परिसरातील विविध मठ, धर्मशाळा तसेच मंदिर परिसरातील गल्लीबोळांमधून असलेल्या घरे आणि मोठ्या वाड्यांमधून हरिजागर सुरु होता. येथील चंद्रभागा वाळवंटामध्ये भाविकांची व्दादशी दिवशी मध्यरात्री पासूनच स्नानासाठी गर्दी झालेली होती. चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा करुन शहरातील अनेक मठ, धर्मशाळांमधून पहाटेपासूनच वारकऱ्यांची व्दादशीच्या न्ह्याहरीची लगबग चाललेली दिसत होती. व्दादशी निमित्ताने मठ,धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती दिसत होत्या.
यात्रा पोहच करुन परत जाताना घरातील मंडळींसाठी प्रसाद म्हणून चिरमुरे, बुदींचे लाडू, घरातील लहानग्यांसाठी खेळणी तसेच रोजच्या पुजेच्या वेळी लागणारं हळद,कुंकु,अष्टगंध,बुक्का आणि उदबत्तीपुडे, गोपिचंद आदी प्रासादिक वस्तुंची तसेच देवदेवतांच्या तांब्या, पितळेच्या मुर्ती, फोटोफ्रेम आणि सोलापूर चादरी घोंगडी आदी वस्तुंच्या खरेदीसाठी भाविकांची दुकानांमधून झुंबड उडालेली दिसत होती.
——————
मंदिर परिसरात भाविकांची गर्दी
व्दादशी सोडून सामानांची बांधाबांध करुन वारकरी परतीच्या प्रवासासाठी मुक्कामाच्या ठिकाणांहून बाहेर पडत थेट विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन करण्यासाठी मंदिर परिसरात दाखल होत होते. त्यामुळे पहाटे पासूनच मंदिर परिसरातील महाव्दार आणि पश्चिमव्दारामध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झालेली होती.
























