पंढरपूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ७३ कोटी रुपयांचा निधी दिला. त्या निधीतून मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यांचे हे आध्यात्मिक कार्य राज्यातील वारकरी भाविकांच्या कायम स्मरणात राहील. अजितदादा विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नेहमी भेटले की, मंदिराच्या कामाची आपुलकीने विचारपूस करायचे, अशी आठवण विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दैनिक सोलापूर तरुणभारत शी बोलताना सांगितली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (ता.२८) विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. ही बातमी समजताच मनाला खूप दुःख झाले. माघ वारी सुरू आहे. ऐन वारीकाळात पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.यातून भगवान पांडुरंगाने त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ द्यावे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाच्या कामाचा प्रस्ताव मंदिर समितीने राज्य सरकारकडे पाठवला तेव्हा अजित पवार यांनी कोणताही विचार न करता, तत्काळ मंदिराच्या कामासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर त्यांनी स्वतः मंदिर समितीशी संपर्क करून मंदिराचे काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना देखील दिल्या. त्यांच्या मुळेच विठ्ठल मंदिर जतन व संवर्धनाचे काम आज पूर्णत्वाकडे आले.
अलीकडेच अजित पवार औसा येथे आले होते. त्यावेळी देखील त्यांनी मंदिराच्या कामाबाबत चौकशी करून मंदिर खूप सुंदर आणि देखणे झाले पाहिजे, अशी भावना व्यका केली होती. कामासाठी आणखी निधी लागला तर सांगा आपण देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. श्री विठ्ठलाचा सच्चा भक्त आज आपल्यात नाही, हे मनाला वेदना देणारे आहे. महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची भावनाही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केली.
























