नाशिक : संसाराचा गाडा हाकणार्या महिलेच्या हाती आता थेट एस.टी. बसचे स्टेअरिंग आले आहे. आजवर केवळ वाहक अर्थात कंडक्टर म्हणून काम करणार्या महिला एस.टी. बसचालक म्हणूनही आपले कौशल्य दाखवत असल्याने प्रवाशांसाठीही एस.टी.चा हा निर्णय लक्षवेधी आहे. माधवी साळवे या पहिल्याच एस.टी. बसचालक ठरल्या आहेत. त्यांनी नाशिक ते सिन्नर मार्गावर बस चालवून महिलांना नवी वाट दाखवली आहे.
नाशिकमधील धुडगाव येथे राहणार्या माधवी यांचा गृहिणी ते बसचालक असा प्रेरणादायी प्रवास आहे. एसटी महामंडळाने 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिलांची चालक पदावर निवड केली होती. या सर्व महिलांना एक वर्ष जड वाहन (हेवी व्हेईकल) चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला. आता या महिलांना एसटी बसवर चालक म्हणून रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे. माधवी यांना लहानपणापासून वाहन चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी यांनी सांगितले. अधिकाधिक महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहनही त्यांनी केले.