सोलापूर शहरातील १३ पूर्व मंगळवार पेठेतील शिवानुभव मंगल कार्यालयावरील महावीर अर्बन को. ऑप बँकेत दोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल व चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आला आहे.बुधवार पेठेतील कृष्णा नारायण जुना देगाव नाका परिसरातील शेखर काशिनाथ गायकवाड व तेजस सुधाकर बेरूनगी आणि देगाव परिसरातील साठे-पाटील वस्तीतील रोहित यलप्पा लोणी या तरुण मित्रांनी १० ऑगस्टला महावीर बँक फोडण्याचा प्लॅन केला. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी बँकेचा पहिला दरवाजा तोडून दुसरा लोखंडी दरवाजाही उचकटला आणि आत प्रवेश केला. त्यांनी सुरवातीला कॅशिअर रूम पाहिली.
त्यानंतर ते सांगितले, लॉकरकडे वळले पण, त्यांना लॉकर उघडलाच नाही. शेवटी मोबाईल घेऊन ते चौमेही तिथून पसार झाले. जोडभावी पेठ पोलिसांत या प्रकरणी फिर्याद दाखल झाली आणि शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला. शनिवारी (ता. १२) ते ‘डीआरएम’ कार्यालय परिसरातील बालविकास शाळेजवळील मोकळ्या मैदानात ते चौघेही थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलिस अंमलदार दिलीप किर्दक, सचिन होटकर महेश शिंदे, राजू मुदगल, सैपन सय्यद, कुमार शेळके, अजिंक्य माने, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड यांच्या पथकाने त्यांना पकडले.
त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी चौघांनी मिळून कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे सांगितले. सोलापूर शहरात एटीएममध्ये चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, चैन स्नॅचिंगसह इतर गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, अनेक गुन्ह्यांमध्ये शहर पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. महावीर अर्बन बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना शहर गुन्हे शाखेने ४८ तासांत शोधून काढले आहे. पोलिस आयुक्त डॉ. अंकुश माने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तपास पथकाचे कौतुक केले आहे.