बार्शी – येथील सेंट जोसेफ विद्यालय येथे सोमवारी निर्भया पोलीस पथकाच्यावतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता ७ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांना मुलींच्या सुरक्षेबाबत, मुलींची छेडछाड, गुड टच–बॅड टच, सायबर गुन्हे, शिक्षणाचे महत्त्व तसेच आपत्कालीन सेवा डायल ११२ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी निर्भया पथकाचे पोहेकॉ बाबासाहेब घाडगे व मपोकॉ नम्रता गटकुळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध उदाहरणांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण केली. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहावे, अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे तसेच संशयास्पद हालचालींची तात्काळ माहिती पालक किंवा पोलिसांना कशी द्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मुलींच्या सुरक्षेबाबत विशेष मार्गदर्शन
कार्यक्रमात विशेषतः मुलींच्या संरक्षणासंदर्भात आवश्यक दक्षता, सार्वजनिक ठिकाणी व शाळेबाहेरील वर्तन, तसेच संभाव्य धोक्याच्या परिस्थितीत स्वतःचे रक्षण कसे करावे याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच छेडछाड, पाठलाग, ऑनलाईन त्रास किंवा कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित निर्भया पोलीस पथक किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
गुड टच – बॅड टच संकल्पना स्पष्ट
लहान वयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुड टच आणि बॅड टच या संवेदनशील विषयावरही अतिशय सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. कोणती स्पर्शाची वर्तणूक योग्य आहे आणि कोणती अनुचित आहे, याची स्पष्ट जाणीव विद्यार्थ्यांना करुन देत अशा प्रकारच्या घटनांची माहिती त्वरित पालक किंवा शिक्षकांना देण्यास सांगण्यात आले.
सायबर गुन्ह्यांविषयी जागरुकता
आजच्या डिजिटल युगात मोबाईल व इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी सखोल माहिती देण्यात आली. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके, फेक आयडी, ऑनलाईन फसवणूक, गेमिंग ॲप्समधील सापळे तसेच ओटीपी किंवा पासवर्ड कुणालाही न देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कायदे व हेल्पलाईनची माहिती
मुली व महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती देत, कोणतीही तक्रार असल्यास ती दडपून न ठेवता तात्काळ निर्भया पोलीस पथक, पोलीस ठाणे किंवा डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य वर्गिस कुरियन, शिक्षक अमित सम्युअल, तसेच निर्भया पथकाचे पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, मपोकॉ नम्रता गटकुळ, पोकॉ भाऊसाहेब पाडुळे उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी–विद्यार्थिनी या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित होते.

























