राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी शुभम कुमार (३०) या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पोलिसांनी त्याला वारंवार सूचना देऊनही त्याने ऐकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी (५ मे) रात्री ११:१५ च्या सुमारास वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ७ क्रमांकाच्या मार्गिकेवरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत होता. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला त्वरीत ६ क्रमांकाच्या मार्गिकेवरून जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सुसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही तरुण थांबला नाही, त्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरूच ठेवला अखेर पोलिसांनी त्याला थांबवलं आणि चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण अभिनेता असल्याचं सांगितले. हा ३० वर्षांचा तरुण माउंट मेरी परिसर, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.