करकंब – आदर्श पुत्र,एकपत्नी वृत्ती,आदर्श राजा म्हणून पूजनीय सत्यधर्म आणि नैतिकतेचे पालन करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे जन्मस्थान आयोध्या येथील मंदिर २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य,दिव्य स्वरूपात पूर्णत्वास आल्यामुळे प्रभू श्रीरामांची ५०० वर्षांच्या वनवासातून मुक्तता झाली.तेव्हापासून अनेक हिंदू भाविक अयोध्येतील श्रीरामलल्लांचे मोठ्या संख्येने दर्शन घेत आहेत.
भाळवणी (नाईकाची) ता.पंढरपूर येथील असेच एक रामभक्त निवृत्त प्राध्यापक कल्याण दिगंबर कलढोणे वय (७० वर्षे) यांनीही १५०० कि.मी. पायी प्रवास करून रामलल्लांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला.त्या संकल्पणेप्रमाणे परमपूज्य सदगुरू काशिनाथ महाराज रामदासी श्रीराम मंदिर भाळवणी यांचा पुण्यतिथी सोहळा कार्तिक वद्यषष्ठी रोजी संपन्न झाल्यानंतर कार्तिक वद्यसप्तमी म्हणजेच ११ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रभागा स्नान करून विठ्ठल दर्शन घेऊन त्यांनी पायी प्रवासास सुरुवात केली.या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर गुरुवर्य ह.भ.प.वासुदेव महाराज फलके (बारामती वय ६०वर्षे) ह.भ.प विठ्ठलबुवा (लोहा ता.नांदेड वय ६० वर्षे) हे राम भक्तही सामील झाले.वय जास्ती असले तरी ऊन,वारा,पाऊस कडाक्याची थंडी अंगावर झेलत नदी, नाले,ओढे,निर्मनुष्य अनोळखी रस्ते यांची पर्वा न करता रमतगमत,मजल दरमजल करीत रामनामामध्ये एकरूप,समरस,तल्लीन,देहभान विसरून प्रवास केल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक अथवा मानसिक त्रासाची जाणीव झाली नाही.रामलल्लांचे नामस्मरण करत रामलल्लांच्या दर्शनाच्या ओढीने ५५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रविवार दि.४ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी अयोध्येत प्रवेश केला.त्यावेळी त्यांच्या सर्वांच्याच मनाची अवस्था संत तुकाराम महाराजांच्या आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या अभंगाप्रमाणे झाली. सोमवार दि.५जानेवारी २०२५ रोजी आयोध्या नगरीची प्रदक्षिणा पूर्ण करून महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यातून येणाऱ्या आनंदअश्रूंना ते थांबवू शकले नाहीत.यादरम्यान त्यांनी प्रयागराज,चित्रकूट,काशी या तीर्थक्षेत्रांनाही भेटी देऊन तेथील देवी देवतांचे आशीर्वाद घेतले.
अयोध्येला पायी जाण्यासाठी प्रवास सुरू करताना कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर अशी मनाची अवस्था होती.प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत प्रवेश करताच मनाची उत्कंठा शिगेला पोहोचली.प्रत्यक्ष आयोध्येत प्रवेश केल्यानंतर मनाची अवस्था आनंदीत झाली.प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात प्रवेश करताच संत तुकारामांच्या आनंदाचे डोही आनंदाचे तरंग आनंदची अंग आनंदाचे याप्रमाणे झाली.मन भरून आले जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले.
रामभक्त.कल्याण कलढोणे, भाळवणी ता.पंढरपूर.
यापूर्वी कल्याण कलढोणे यांनी सलग ८ वर्षे आळंदी ते पंढरपूर असा आषाढी वारीमध्ये पायी प्रवास करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे.त्यांनी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली आहे. विठ्ठलबुवा हे आळंदी ते पंढरपूर मासिकवारी करणारे वारकरी म्हणून ओळखले जातात.
अयोध्या प्रवासादरम्यान या रामभक्तांनी त्रिशूलभेद या नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरास भेट दिली. विशेष म्हणजे या मंदिरातील पुजारी महाराष्ट्रातील असून जबलपूरमध्ये राहणाऱ्या मराठी,महाराष्ट्रीयन लोकांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे.जबलपूर सारख्या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर पाहून त्या सर्वांना खूपच आनंद झाला.
प्रापंचिक जीवनातून उत्तम परमार्थ करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे तिघे रामभक्त.त्या सर्वांनी वय जास्ती असूनही ऊन,वारा,पाऊस कडाक्याची थंडी यांची पर्वा न करता १५०० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून श्रीरामलल्लांचे दर्शन घेतले याचे समाधान वाटले.याचबरोबर या तिघांच्या कुटुंबाने एवढ्या लांब प्रवासाला जाण्याची अनुमती दिली त्याबद्दल त्यांनाही शतशः धन्यवाद.
दशरथ बाबर.
कष्टाचे भागीदार आपण स्वतः असलो तरी सुखदुःखाचे भागीदार कुटुंब असते.आपणास प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी पायी जाण्यास परवानगी देणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचेही मनःपूर्वक अभिनंदन.प्रभू श्रीरामांची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहावी हीच मनोकामना.
डॉ.नशटे नेवरे.


























