सोलापूर – येथील सैफुल जवळील ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार, परकीय भाषांच्या आक्रमणात मराठी भाषेचा दर्जा टिकावा आणि तिची गोडी तरुण पिढीला कळावी, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
या पंधरवड्यांतर्गत महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हस्ताक्षर स्पर्धा, कविता वाचन आणि कथाकथन स्पर्धा अशा विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून सोलापूरच्या ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप), सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. (सौ) श्रुतीश्री वडगबाळकर उपस्थित होत्या. त्यांनी भाषेचा उगम, तिची प्रगती आणि भाषेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर म्हणाल्या की, “भाषा हा व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य पैलू आहे. मातृभाषेचा सराव हा इतर भाषा शिकण्यासाठी पाया ठरतो. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतील साहित्याचे वाचन करून त्याचा दैनंदिन जीवनात योग्य वापर करावा.”
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. एस. पाटील आणि प्रा. आर. एम. पंतोजी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील, सचिव श्री शिवानंद पाटील व कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. एस. पाटील यांनी केले, तर आभार प्रा. पंतोजी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. बिराजदार, प्रा. घालीमठ, प्रा. देशपांडे आणि प्रा. देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
*फोटो ओळी:- याप्रसंगी डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांच्या समवेतप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. एस. पाटील आणि प्रा. आर. एम. पंतोजी व प्राध्यापक वृंद*






















