सोलापूर : येथील ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AGPIT) मध्ये ‘अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक उत्पादकतेसाठी जेनेरेटिव्ह एआय’ (Generative AI for Teaching, Research and Academic Productivity) या विषयावर आयोजित प्राध्यापक विकास कार्यक्रमास (FDP) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग व ब्लूमझन इन्फॉसोलुशन्स प्राव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ (Artificial Intelligence) प्रभावी वापर कसा करावा, यावर यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नेहा जेला उपस्थित होत्या. त्यांनी प्राध्यापकांना ‘चॅटजीपीटी’ (ChatGPT), ‘गुगल जेमिनी’ (Google Gemini) यांसारख्या एआय टूल्सचा वापर करून क्लिष्ट संकल्पना कशा सोप्या कराव्यात, तसेच संशोधनामध्ये (Research) डेटा ॲनालिसिससाठी एआयचा वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष (Hands-on) प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांनी बदलत्या काळातील तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी ‘एआय’ टूल्सच्या वापरामुळे शैक्षणिक कार्यात गती येईल आणि उत्पादकता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिसबाह अत्तार यांनी केले, तर आभार प्रा. मेघा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. ए. पी. होसले व प्रा. एम. एन. देशमुख यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. ए. बी. वळसंग, प्रा. ए. बी. हन्नूरे, प्रा. आर. एस. होर्तिकर आणि प्रा. टी. व्ही. पाटील यांनी परिश्रम घेतले.
*फोटो ओळी:- एआय कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शक नेहा जेला यांच्या समवेत प्रा. एस. व्ही. कुलकर्णी व शिक्षक वृंद*
























