तभा फ्लॅश न्यूज/ माहूर : तालुक्यातील मौजे मेट या माहूर-मांडवी-किनवट राष्ट्रीय महामार्गावरापासून तीन किलोमीटर अंतरावर आडपेठी अत्यंत दुर्गम डोंगराळ परिसरातील गावाला जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पूलाखालील नळकांडे फुटल्याने पूलाच्या एका बाजूला मोठे भगदाड पडून हा पूल रहदारी व वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता.काही जागरूक नागरिकांनी यापुलाला पडलेल्या भगदाडाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर जाग आलेल्या संबंधित विभागाकडून या पूलाची उंची वाढवून नवीन पूल बनविणे ऐवजी या पूलाला पडलेले भगदाड गीट्टी टाकून बुजविल्याने पूलाखालून जाणारे पाणी आता चक्क पूलावरून वाहत असल्याने वाटसरुंसह वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागांकडून माहूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्याला जाणारे अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविल्या गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी उंची वाढवून पिलरचे मजबूत पूल बनविणे ऐवजी नळकांडे टाकून त्यावर मुरूम टाकून पूल बनविले गेले असल्याने जवळपास सर्वच मार्गावरील पूल तुटले किंवा त्यांना भगदाड पडले आहेत. परिणामी या ग्रामीण भागातील नागरिकांचा महामार्गाशी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून खासदार निधी,
आमदार निधी या सर्व निधी मधून झालेले अंतर्गत रस्ते आणि त्यावरील पूल अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आल्याने नागरिकांना त्यावरून वाहने चालविणे तर सोडाच पायी चालणे सुद्धा अडचणीचे ठरत आहेत. छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब झाली असून, भविष्यात या रस्त्यावर एखादी अपघाताची मोठी दुर्घटना होऊन अनर्थ होण्याआधी मौजे मेट या रस्त्यावरील नळकांडी आणि बुटक्या पूलाची मजबूत सिमेंट कॉंक्रिटचे पिलरच्या सहाय्याने उंची वाढवून दिर्घकालीन उपाययोजना करुन नागरिकांच्या जीवाला होऊ शकणारा संभावित धोका टाळावा,अशी मागणी मौजे मेट येथील सरपंच सौ.यशोदा येरमे यांचेसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी के.एस.कराड, सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल मुनेश्वर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.