सोलापूर : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येईल. यासाठी लवकरच संयुक्त विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खीराडकर यांनी आज विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट घेऊन महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीवेळी नगरसेवक अक्षय अजिखाने, यतिराज व्हनामाने आणि भोजराज पवार उपस्थित होते. भेटीदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरातील प्रमुख चौकांमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी, सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंगची अंमलबजावणी तसेच वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्याबाबत विचारविनिमय झाला.
या बैठकीत शहरातील प्रमुख चौकांवरील सिग्नल व्यवस्था सुधारणा, झेब्रा क्रॉसिंगचे प्रभावी नियोजन, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास यावेळी महापौरांनी व्यक्त केला.



















