टेंभुर्णी : येथील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ, निमगाव संचलित आर्या कॉलेज ऑफ फार्मसी येथे नेस्टॉर फार्मास्युटीकल्स, गोवा येथील कॉलिटी ऍश्युरन्स मॅनेजर अमोल कांबळे यांचे ‘रोल ऑफ कॉलिटी ऍश्युरन्स इन फार्मा इंडस्ट्री’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी अमोल कांबळे यांनी फार्मा उद्योगामध्ये क्वालिटी ऍश्युरन्स विभागाचे महत्त्व, त्याचे कामकाज तसेच औषधनिर्मिती प्रक्रियेत गुणवत्ता नियंत्रण कसे राखले जाते याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. याशिवाय इंडस्ट्रीमधील प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि पॅकेजिंग अशा विविध विभागांबाबतही त्यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. डी. फार्मसी शिक्षण पूर्ण केल्यानंतर औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चव्हाण यांनी अमोल कांबळे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. हर्षवर्धन वाघमारे यांनी कामकाज पाहिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















