अकलूज – पवित्र रमजान महिन्यात दान, सहकार्य आणि समाजसेवेची भावना जपत अकलूज परिसरात मानवतेचा सुंदर संदेश देणारा उपक्रम पार पडला. फतेह मोहम्मद फाउंडेशन यांच्या वतीने गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शिरखुर्मा साहित्याच्या १६० किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना ईद सण आनंदात साजरा करण्यासाठी मदतीचा हात मिळाला आहे.
इस्लाम धर्मामध्ये रमजान महिना हा आत्मशुद्धी, संयम, दानधर्म आणि समाजसेवेचा संदेश देणारा मानला जातो. या महिन्यात जकात व दान देऊन समाजातील गरजू बांधवांना मदत करण्याची परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत फतेह मोहम्मद फाउंडेशनने हा सामाजिक उपक्रम राबवला. सणाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे अनेक कुटुंबांना आवश्यक साहित्य मिळणे कठीण जाते. ही गरज लक्षात घेऊन संस्थेने पुढाकार घेत शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य असलेले किट तयार करून ते गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवले.
या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. अबुबकर शेख यांनी सांगितले की, “प्रेषित हजरत मोहम्मद (स्व) यांच्या शिकवणीनुसार समाजातील गरजू व वंचित घटकांना मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ईद हा आनंदाचा सण असून समाजातील प्रत्येक कुटुंबाने तो आनंदाने साजरा करावा, या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.”
या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मोहम्मद रफीक मुल्ला, सचिव जिब्राईल नदाफ, नगरसेवक मोहसीन शेख, ॲड.वजीर शेख , नगरसेवक अजहर शेख,संग्रामनगरचे माजी सरपंच कमाल रहमान शेख यांच्या हस्ते गरजू नागरिकांना शिरखुर्मा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे ही खरी सामाजिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला इस्माईल मुजावर, महमूद काजी, शमशुद्दीन मुल्लानी, मौलाना अब्दुल्लागणी शेख, बंडू शेख, बशीर मुल्लानी, संजयकुमार कांबळे, भास्कर काळे, आलम शेख, असलम सय्यद, इरफान बागवान, रुबाब मौलाना आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मौलाना जाकिर हुसेन यांच्या हस्ते फातेहखाणीचा कार्यक्रम कऱण्यात आला. याप्रसंगी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही संस्थेकडून करण्यात आली.
रमजान महिन्याच्या निमित्ताने समाजातील गरजू कुटुंबांना मदत करून त्यांच्यापर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजात एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.
























