भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफर यानं आयपीएलमधील एक नियम रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमामुळं ऑल राउंडर कमी होत आहेत, असं तो म्हणाला.
भारताचा माजी कसोटीपटू आणि पंजाब किंग्ज संघाचा बॅटिंग कोच वसीम जाफर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयपीएलमधील एक नियम रद्द करण्यात यावा, असं म्हटलंय. इंडियन प्रीमिअर लीगमधील इम्पॅक्ट प्लेअर नियम बंद करण्यात यावा, असं त्यांनी मह्टलं आहे. आयपीएलमधील हा नियम बंद केल्यास भारतीय क्रिकेटमध्ये अधिकाधिक ऑलराउंडर खेळाडू निर्माण होतील, असं त्यांनी म्हटलं. सध्या आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार मॅचमध्ये दोन्ही संघ एक एक सब्सटिट्यूट खेळाडू मैदानात उतरवू शकते. हा नियम आयपीएल २०२३ पासून लागू करण्यात आला होता. वसीम जाफर म्हणाले की, मला वाटतं आयपीएलमधून इम्पॅक्ट प्लेअर हा नियम बंद करण्याची गरज आहे. या नियमामुळं बॉलर्सला अधिक वेगवान गोलंदाजी करण्यास प्रोत्साहन मिळत नसून ऑलराउंडरची कमी जाणवत आहे. फलंदाज गोलंदाजी करत नाहीत हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय असल्याचं वसीम जाफर म्हणाले.
इम्पॅक्ट प्लेअर नियम नेमका काय?
इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करण्यासाठी संघाच्या कॅप्टनला टॉसदरम्यान ११ जणांच्या संघासोबत आणखी ५ खेळाडूंची नावं द्यावी लागतात. त्यापैकी एका खेळाडाला सब्सटिट्यूट खेळाडू म्हणून संघाकडून संधी दिली जाते. या नियमानुसार एका संघात १२ खेळाडू असतात. १२ व्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणतात. या नियमामुळं ऑलराउंडर खेळाडूंना महत्त्व दिलं जात नाही. अनेक संघ ६ फलंदाज आणि ५ गोलंदाजांसह मैदानात उतरण्यास पसंती देतात. वसीम जाफर यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाला ऑलराउंडर खेळाडूसाठी संघर्ष करावा लागत आहे. हार्दिक पांड्यासारखा दुसरा ऑलराउंडर खेळाडू नसल्याचा फटका बसला होता.