बार्शी – गाडेगाव रोड बार्शी येथे दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी भरधाव ट्रॅव्हल्सने मॉर्निंग वॉक करणाऱ्या शांतीलाल उत्तरेश्वर बोराडे (रा. बार्शी) यांना जोराची धडक देऊन ट्रॅव्हल्स चालक कोणाला काही माहिती न देता निघून गेला होता. या अपघाताबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्यात ट्रॅव्हल्सचे मालक यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. परंतु सदर ट्रॅव्हल्स चालक रफिक अफजल शेख (रा.रहीमनगर, परभणी) हा गुन्हा घडल्यापासून गेल्या १४ महिन्यांपासून फरार होता. त्याचा यापूर्वी मुंबई, परभणी तसेच इतर ठिकाणी शोध घेतला परंतु तो मिळून आला नव्हता तो कायम फरार असायचा.
बार्शी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोसई महेश गळगटे यांच्यासोबत पोना संगप्पा मुळे व पोकॉ लखन घाडगे यांचे पोलीस पथक नेमले होते. त्यामधील मुळे यांनी परभणी येथे गोपनीय बातमीदार आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमले होते. गोपनीय बातमीदारमार्फत मुळे यांना सदरचा आरोपी हा परभणी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच सदरची माहिती पोलीस निरीक्षक यांना दिली. पोनि यांनी तात्काळ आरोपी अटकेसाठी पोलीस पथक परभणी येथे रवाना केले. परभणी येथे आरोपीस ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई महेश गुळगटे, पोलीस अंमलदार संघप्पा मुळे, लखन घाडगे यांनी केली आहे.


















