‘इंटेल’ या कंपनीच्या ९०च्या दशकातील ‘पेंटियम’ या संगणक प्रोसेसरच्या निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी (६८) यांचा नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघाती मृत्यू झाला. डिझाईनिंगशी संबंधित सात पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत.
बुधवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ५.५० वाजता ते सायकलिंग करत होते. नेरुळ जंक्शन आणि एनआरआय सीवूड्स सिग्नलच्या मध्ये असताना त्यांच्या सायकलला पाठीमागून टॅक्सीनं धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. सैनी यांच्या मागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
चेंबूर अमॅच्युअर सायकलिंग ग्रुपचे ते सदस्य होते. या ग्रुपसह सैनी नियमित सायकलिंग करत होते. सैनी हे चेंबूर ते खारघर, खोपोली अशी सायकलस्वारी करत असत. दरम्यान बुधवारी त्यांच्या सायकलला टॅक्सीने मागून धडक दिली, त्यामुळं ते घसरले आणि त्यांची सायकल टॅक्सीच्या पुढील चाकाखाली अडकली. या प्रकारामुळं घाबरलेल्या कॅब चालकानं गाडी तशीच पुढं दामटली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळून जाणाऱ्या वाहनचालकांनं ती टॅक्सी अडवली. या प्रकरणी आरोपी टॅक्सी ड्रायव्हर हृषिकेश खाडे याच्यावर निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र चौकशीत सहकार्य करण्याची व आरोपपत्र दाखल झाल्यावर न्यायालयात हजर राहण्याची नोटीस त्याला बजावण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
सैनी यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील एका विद्यापीठातून मायक्रोप्रोसेसर आणि डेव्हलपिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि इंटेल कंपनीत रुजू झाले. १९९३ साली इंटेलने निर्माण केलेल्या पेंटियम प्रोसेसरच्या निर्मिती प्रक्रियेत ते प्रमुख रचनाकार होते. मायक्रोप्रोसेसरच्या रचनेशी संबंधित सात पेटंट सैनी यांच्या नावावर आहेत. २००४ मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आणि भारतात स्थायिक झाले होते.