सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना आईवडील व गुरूजनांचे नावलौकीक करण्याचे आवाहन मंद्रूप येथील केंद्रीय मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यांनी केले. लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडलअधिकारी ज्योतीराम पवार होते.
यावेळी प्राचार्य बसप्पा घाटे, उपप्राचार्य बसवराज कुमठेकर, पत्रकार अमोगसिद्ध मुंजे व पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी यांची उपस्थिती होती . यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील महिला शिक्षिका व प्राध्यापिका यांचे सत्कार करण्यात आले . तसेच प्रशालेतील रंगभरण व चित्रकला स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना मंडळ अधिकारी पवार म्हणाले की , लोकसेवा प्रशालेचे विद्यार्थी नेहमी विविध क्षेत्रात प्रसिद्धीस येत आहेत. या प्रशालेत शिक्षिकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जातो. म्हणून येथील विद्यार्थी गुणवान व यशवंत आहेत . भावी काळातही येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धानप्पा बगले यांनी केले, तर सुभाष सुतार यांनी आभार मानले.
…























