मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, कॅन्सरची झुंज अपयशी झाल्याने त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय ६७ होते. अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजय कदम यांच्या निधनानंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. कदम यांनी अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी ‘सही दे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘टूरटूर’ या नाटकांमध्ये काम केले असून त्यांनी साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.
तसेच त्यांनी ‘चष्मेबद्दूर’, ‘मंकी बात’, ‘ब्लफमास्टर’, ‘टोपी घाला रे’, ‘भेट तुझी माझी’, ‘देखणी बायको नाम्याची’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. विजय कदम यांनी शेवटी झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ मालिकेत बाबूराव तांडेल ही भूमिका साकारली. विजय कदम यांनी जाहिरातीमध्येही काम केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये काम केले होते आणि ही जाहिरात प्रचंड गाजली होती.