किनवट – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १ कोटी ५२ लाख ७१ हजार २४७ रुपयांच्या नवीन शेतकरी भवन उभारणीसाठी राज्याच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ.भीमराव केराम यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. केराम म्हणाले की,राज्य सरकारने संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतंर्गत राज्यतील कृषी उत्पन्न बाजार समितींना शेतकरी भवन बांधकामासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी,सोबतच मूलभूत सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात,यादृष्टीने हा निर्णय अंमलात येत आहे.
योजनेतंर्गत ज्या बाजार समितीत आधीपासूनच शेतकरी भवन नाही,त्या बाजार समित्यांसह शेतकरी भवन अस्तित्वात आहे,परंतु सुस्थितीत नाही,अशा बाजार समितींना दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२२ – २३ च्या दरसूचीवर आधारित नवीन शेतकरी भवनासाठी सल्लागार अभियंत्यामार्फत १ कोटी ५२ लाख ७१ हजार २४७ रुपयांचे अंदाजपत्रक सहकार, पणन विभागाकडे दाखल केले होते.
सदर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी,यासाठी आ.भीमराव केराम यांनी सहकार मंत्री व संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला.त्यानंतर राज्याच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव माधवी सं. शिंदे यांनी दि.२ फेब्रु.रोजी ‘क’ वर्गात येणाऱ्या
किनवट बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिल्याचे पत्र निर्गमित केले आहे.सहकार विभाग वरील अंदाजपत्रकापैकी दोन टप्प्यात ७० टक्के निधी देणार असून,उर्वरित खर्च हा स्वनिधी अथवा कर्जातून करावयाचा असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

















