बार्शी – जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीत मी काही घडवले नाही तर ते घडून आले आहे. पदाधिकाऱ्यांनी ते घडवले. जो जे व वांछील तो ते लाहो या उक्ती प्रमाणे ज्याला ज्या चिन्हावर लढायचे त्याला मुभा दिली एवढेच आहे. तुतारी अन घड्याळ एकच आहे. हे सर्व जमून आलं आहे. चांगली चांगली फुले, चांगल्या दोरीत गुंफण्याशिवाय पर्याय नसतो, मी स सुईचे काम केले, अशी कबुली उद्धव सेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महा आघाडीच्या विजय निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास बारबोले, निरंजन भूमकर, उद्धव सेनेचे प्रवीण काकडे, शिंदेसेनेचे आनंद यादव, अध्यक्ष नंदकुमार काशीद, विक्रम सावळे, नागेश अक्कलकोटे, ओमप्रकाश पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
सोपल पुढे म्हणाले,चांगलं काम करणाऱ्याला त्रास म्हणजे विकास नव्ह. चार हजार कोटी खरंच आलं का, माहीत नसलेले रस्ते केले म्हणता, आणि रस्ते म्हणजे फक्त विकास नव्हे. समाज चहू अंगाने फुलला पाहिजे. आम्ही कितीतरी माणसे उभी केली.मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्प उभे केले. अनेक संस्था उभ्या केल्या. विरोधक काय केलं म्हणतात ही एक गंमतच आहे.मी मानस मोठी केली मी स्वतः मोठा झालो नाही. आणि मी माणस कधी दाबली नाही. काही जणांचे हुक अडकले असतील.म्हणून ते तिकडे आहेत. रहा बाबा तिथेचं . निवडणूक कुठली आहे आणि उठ सूट शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत.विषय कुठला अन काहीही बोलत आहेत.मला तर त्यांना उत्तर सुद्धा देऊ वाटतं नाही. विरोधकाला मोक्कार बोलायची सवय लागली आहे.कोण मागतय,कुणाची इस्टेट असे म्हणत विरोधकांवर टीका केली. त्यांना विकासच दिसत नसेल तर अआंधळेपणा म्हणावा लागेल.
तालुक्यातील पहिला सिमेंट बंधारा मी बांधला. नुसतं म्हणायचे काय केले चाळीस वर्षात. आम्ही आजवर ही विकास करत आलो आहोत. इथून पुढे आपले हे उमेदवार सत्तेत येणार आहेत.आता तुम्ही निधी आणणार आहात आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. रिमोट तुमच्याकडे तर त्याचे सेल आमच्याकडे आहेत. आपलं भांडण कुठल्या पक्ष्याशी नाही. तर विध्वंसक प्रवृत्ती विरोधात आपली लढाई आहे असेही सोपल म्हणाले.
निरंजन भूमकर म्हणाले,भिण्याचे कारण नाही आता आपल्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत. काम कशी होतील ते ही आपल्याला कळेल. पोलीस स्टेशन असेल तर तहसीलदार असो आपलं काही अडणार नाही. कुणाला घाबरायचं कारण नाही. मतभेद बाजूला ठेवा. स्वतः सोपल उभा आहेत असे समजा.
विश्वास बारबोले म्हणाले,बार्शी तालुका राज्यात गाजतोय. असे करण्याची गरज का भासली. विरोधकांनी सत्तेच्या जोरावर गावागावात वेठीस धरून प्रवेश करून घेतले. हा विरोधी मनसुबा हाणून पाडला. आपल्याला सत्तेतील लोकं बोलवत आहेत. कुणी घाबरू नका. एसपी, कलेक्टर असो काही अडणार नाही. कार्यकर्त्यांना आधार मिळण्यासाठी सोपल साहेब यांनी ही युती घडवून आणली आहे. आपल्या अन त्यांच्या मतात जास्त फरक नाही. विधनसभेसारखं काम करा. ते चारी मुंड्या चित होतील. विधनसभेसारखं वर्क फ्रॉम होम करा. तिकडे गुंडगिरी, दडपशाहीचं वातावरण आहे. सत्तेचा फायदा आजवर आपल्याला होत नव्हता.तो आता होणार आहे.
वाहेद शेख, विकास जाधव, शिवाजी पवार,सुरेश कापसे, नागेश अक्कलकोटे यांनीही विचार व्यक्त केले.

























