सोलापूर – अमित ठाकरेंनी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे कुटुंबियांची रविवारी भेट घेत सांत्वन केले. बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी व दोन लहान मुलींनी अमित ठाकरेंसमोर टाहो फोडला. अमित ठाकरेंसमोर बाळासाहेब सरवदे यांच्या दोन चिमुकल्या मुलींनी ‘बाबा गेला…मला माझे पप्पा आणून द्या, मी काही नाही केलंलं पप्पा मला, का गेला सोडून’, असा टाहो फोडला. अमित ठाकरेंना देखील अश्रू अनावर झाले. हे भावूक क्षण पाहून बाळासाहेब सरवदेच्या कुटुंबातील सर्वच जणांचे डोळे पाणावले.
अमित ठाकरे रविवारी दुपारी सोलापूरला आले. त्यांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. मृत बाळासाहेब सरवदे यांना दोन छोट्या मुली आहेत. या मुलींना माहितीच नाहीय त्यांच्या वडिलांची हत्या झालीय. गर्दी पाहून या दोन मुली ‘माझे पप्पा कुठे आहेत?, असा सवाल उपस्थित करत आहेत. त्या दोन मुलींकडे पाहण्याचे आणि त्यांचे उत्तर देण्याचं धाडस कुणाकडेच न्हवते.
‘मी इथल्या पोलिसांना भेटणार नाही त्यांना विनंती करणार नाही. थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आणि न्याय मागणार’, अशी संतप्त प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना दिली. पैसे देऊन उमेदवारी अर्ज परत घ्यायला लावणे ठीक होते; परंतु आता तुम्ही खून करायला लागले आहात, असा सवाल त्यांनी भाजपला केला. अशा निवडणुकाच आम्हाला नको आहेत, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ही आपल्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती भाजपने आणून ठेवली आहे. मी कधी कोणी वारल्यानंतर राजकारण करत नाही आणि आज पण करायला आलो नाही. पण कधीतरी भाजपला कळणार आहे की नाही, राज्य कोठे नेऊन ठेवले आहे. मला वाटते आपल्यातला माणूस जागा झाला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांना माझी विनंती आहे, त्यांनी महापालिकेचा प्रचार सोडून एक दिवस सोलापुरात येऊन सरवदे यांच्या कुटुंबाची भेट घ्यावी. तेव्हा तुम्हाला निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे कळेल.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून मनसे नेते बाळासाहेब सरवदे वय 36 वर्ष, रा. जोशी गल्ली, सोलापूर यांची हत्या करण्यात आली. भाजपच्या दोन गटात झालेल्या वादावादीतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांना ठार करण्यात आलं आहे. सरवदे यांच्या हत्येमुळे सोलापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. रविवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे सोलापूरला आले होते.
यावेळी बाळासाहेब यांच्या पत्नी वंदना सरवदे, भाऊ बाजीराव, दोन मुली, परिवारातील सदस्य, नातेवाइक यांची गर्दी होती.
आरोपींना फाशीची शिक्षा द्या, मकोका लावा
अमित ठाकरे यांनी रविवारी सरवदे कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वन केले. सरवदे कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. ठाकरे यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. बाळासाहेबांना न्याय द्या, त्यांचा खून करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, त्यांच्यावर मकोका लावा, अशी मागणी कुटुंबीयांनी ठाकरेंकडे केली.

















