बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्यावतीने शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. हा पुरस्कार थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना संयुक्तपणे लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी टी पाटील, सहसचिव ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. कृष्णा मस्तुद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, देशाचा विकास हा तरुणांवर अवलंबून आहे. भाषण व मार्गदर्शनाऐवजी कार्य करीत आहोत. सातत्याने कर्म करीत रहावे यात समाधान मानले. आदिवासी व कुष्ठरोग्यांची सेवा केली. बाबा आमटे यांच्याकडून ही समाजसेवेची प्रेरणा घेतली. बाबा आमटे यांचे कार्य महान होते. त्यांनी श्रमाचे संस्कार केले. माणुसकीतून सेवा केली. म्हणूनच आदिवासींची भीती व कुतूहल यांच्याशी मिळते जुळते घेऊन कार्य करु शकलो. या कार्यात डॉ. मंदाकिनी आमटे यांनी बरोबरीने साथ दिली. भौतिक संसाराबरोबर सामाजिक व आरोग्य सेवा केली. अंधारमय जीवनात प्रकाश देण्याचे कार्य केले. अज्ञान व अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या समाजात शिक्षणाद्वारे क्रांती केली. आदिवासी, अनाथ व वंचित यांना मुख्य प्रवाहात आणले. सध्या आमटे परिवाराची चौथी पिढी आदिवासींच्या सेवेत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले. तसेच पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी देखील पुरस्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, आपणही काहीतरी वेगळे कार्य करावे असा सुरुवातीलाच संकल्प केला. दोघांनीही बरोबरीने काम केले. रस्ते, पाणी, वीज, अन्न, आरोग्य सेवा आदींचा अभाव असलेल्या क्षेत्रात काम केल्याचे समाधान आहे. आजही एकत्रितपणे सर्वजण दैनंदिन कार्य करत आहोत. आदिवासींचे गुण व आपले दोष ओळखले. आदिवासींची संस्कृती व परंपरा खूप चांगली आहे. शिक्षण व आरोग्य याद्वारे आदिवासींचे आयुष्य समृद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, श्रम मूल्य जपण्याचा संदेश मामांनी दिला. बाबा आमटे यांनी आदिवासीना माणसात आणले. बाबा व मामा यांच्या कार्यशैलीत एकवाक्यता आहे. बाबा व मामा यांचे जीवन आव्हानांचे होते. पण ते घाबरले नाहीत. मामांनी ज्ञान व आरोग्य मंदीर उभा केले. वेदना हीच जीवनाची साधना आहे, असे बाबा म्हणत. शिक्षणातून माणूस निर्माण झाला पाहिजे. मूल्यधिष्टीत, चारित्र्यवान व श्रम संस्काराचा माणूस शिक्षणातून घडविला पाहिजे. मामांनी समाजाची वेदना व व्यथा मांडली. मामांच्या विचाराचा धागा निरंतर जोपासा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव यांनी मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी कर्मवीर मामांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. संस्थेच्या लोकसहभागातून केलेल्या कार्याची माहिती विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी स्वागतपर संबोधन केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. कृष्णा मस्तुद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सत्कारमूर्तीचा परिचय संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी अध्यक्षांचा परिचय डॉ. सुग्रीव गोरे यांनी करुन दिला. पी टी पाटील यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. यावेळी संस्थेच्या “कर्मवीर तपस्या” या पाक्षिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागाने “वसा घेऊया कर्मवीरांचा” हे स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन डॉ. पी ए. पाटील व प्रा. माधुरी शिंदे यांनी तर आभार प्राचार्य डॉ. व्ही. पी. शिखरे यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शाखाप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, हितचिंतक, कर्मवीर प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

















