बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमात युवकांच्या पुढाकारातूनच एड्समुक्त समाज उभारता येऊ शकतो, असा ठाम संदेश प्रमुख पाहुणे व अध्यक्षीय भाषणातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ए. व्ही. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. ए. ढगे यांनी करताना एनएसएस विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे प्रा. ए. व्ही.पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “एड्सविषयीचे गैरसमज दूर करणे हीच खरी जनजागृती. हा आजार लपवण्याचा विषय नाही; माहिती, जागरुकता आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. युवकांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन पसरवला तर एड्समुक्त समाजाचे स्वप्न नक्कीच साकार होईल.”
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारुन संवाद साधला. युवकांची ही जिज्ञासा आणि तयारी पाहून प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे सर यांनी आरोग्य जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “युवक हे समाजाचे आरसे आहेत. त्यांच्याकडे ज्ञान, ऊर्जा आणि विचारशक्ती आहे. प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी व योग्य माहितीचे प्रसारण युवकांनी केल्यास एड्स विरोधी लढा अधिक प्रभावी होईल. एन.एस.एस. च्या माध्यमातून विद्यार्थी समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात.”
कार्यक्रमाचे आभार डॉ. बी. डी. लांडे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील एकूण १५५ विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्रा. एन. आर. सारफळे, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. एम. पी. शिंदे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एड्स दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून समाजात आरोग्य जागृतीचा संदेश पोहोचवणारा आणि संवेदनशीलतेची नवी दिशा देणारा ठरला.
























