सोलापूर : निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे व प्रचंड धूळ पसरली आहे. आज बुधवारी सकाळच्या सुमारास या खड्डेमय रस्त्यावरून जात असताना एका वृद्ध व्यक्तीचा अपघात होऊन ते रस्त्यावर पडल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे
त्यामुळे आता नागरिकांना तसेच वाहनधारकांना येथून ये जा करणे अवघड झाले आहे. येथील खड्ड्यामुळे वयोवृद्ध नागरिकांचा तोल जाऊन खाली पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते.संबंधित रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता अधिकच खराब झाला असून काम अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
महापालिका प्रशासन व या प्रभागातील नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम तसेच पाईपलाईनचे काम त्वरीत पूर्ण करावे. रस्त्याची दुरुस्ती करून धूळ नियंत्रणाची उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी जोरदार मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.


















