छतावरून पडल्याने जखमी झाले असे कारण सांगत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शवविच्छेदन अहवालात व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाला नसून हा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वडील दारू पिऊन आईला मारहाण करतो म्हणून मुलानेच चाकूने भोसकून बापाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज हुसेन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर हैदर इम्तियाज हुसेन (वय २२) असे आरोपी मुलाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी इरफान फातिमा हुसेन (वय ४५, रा. भोईवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तियाज व इरफान फातिमा या दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा आहे. ते कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह भागवते. यातील मयत इम्तियाज हुसेन यांना दारूचे व्यसन होतं. इम्तियाज हे दारू पिऊन आल्यानंतर इरफान फातेमा यांना सतत मारहाण करत आणि वाद घालत होते. अनेक वर्षांपासून इम्तियाज हे इरफान फातेमाला त्रास देत होते.
३ मे रोजी दोघांमध्ये वाद झाला. यावेळी इम्तियाज यांनी फातेमाला मारहाण केली. तेवढ्यात मुलगा हैदर तेथे आला. त्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तो आई-वडिलांच्या भांडन सोडवण्यात इम्तियाज यांनी त्याला ”तू आमच्या वादात पडू नको, तू इथून निघून जा” असे सांगितले. यावेळी आईला बेदम मारहाण होत असल्याचे बघून मुलाने वडिलांना धक्का दिला. आतून दरवाजा लावून घेत खिशातील चाकूने वार करत वडिलांची हत्या केली आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला.
यानंतर इम्तियाज हुसेन यांना पत्नी इरफान फातिमा यांनी तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांनी डॉक्टरांना इम्तियाज हुसेन हे छतावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून शविच्छेदन केलं. मात्र अंगावरील जखमा व छतावरून पडल्यामुळे लागलेला मार यामध्ये फरक जाणवला आणि त्यामुळे संशय आला. त्यानंतर हा मृत्यू नसून तर खून असल्याचा प्रकार उघडकीस आला. वडिलांचा मृत्यू झाल्याचा कळताच मुलगा पसार झाला आहे. या प्रकरणी दुय्यम पोलीस निरीक्षक पवन चौधरी तपास करत आहेत.