सोलापूर – पूर्व भागातील पद्मशाली पुरोहित संघ वेदपाठशाळेचा ९१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्धापनदिना निमित्त संघाच्यावतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने समाजामध्ये ऐक्य, सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा, तसेच सर्वांनी आनंदाने जीवन व्यतीत करावे या उद्देशाने संकल्प करण्यात आला. त्यानंतर नवग्रह पूजा व होमहवन करण्यात आले. विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानप्राप्ती व्हावी व त्यांची प्रज्ञा अधिक विकसित व्हावी यासाठी विशेष सरस्वती यज्ञाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला.
या धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य प्रभाकर गाजर्ला, सतीश पोला आणि राजू कोडम यांनी केले. कार्यक्रमाचे यजमानपद संघाचे अध्यक्ष श्रीनिवास म्याडम यांनी भूषविले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाचे सचिव आत्माराम चिप्पा, विश्वस्त वेणुगोपाल म्याना, श्रीनिवास गाजूल, नरेंद्र श्रीमल आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
वर्धापनदिनानिमित्त संघाच्यावतीने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हरी नल्ला, राघवेंद्र आरकाल, मनोहर जडल, नागदेव म्याना, नागशय्या वग्गू व भानुचंद्र चिप्पा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी नल्ला यांनी केले, तर सहसचिव व्यंकटेश जिल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.






















