वैराग – विद्या मंदिर संस्था वैराग संचालित कै. चांगदेव लक्ष्मण घोडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव (आर) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव (आर) यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी ‘बालविवाह मुक्त गाव’ करण्याची प्रतिज्ञा केली.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व उद्घाटन
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष भूषणजी भुमकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी (उपळे बीट) डॉ. विलास काळे, संस्थेच्या संचालिका मृणालजी भुमकर, केंद्रप्रमुख हनुमंत सोनवणे, सरपंच समाधान बनसोडे, उपसरपंच निवृत्ती घोडके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष (हायस्कूल) तुकाराम जाधव व जि. प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजपाल भुसारे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व नूतन रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले.
बालिका दिनाचे औचित्य: सामाजिक शपथ
कार्यक्रमाची सुरुवात बालिका दिनानिमित्त विशेष उपक्रमाने झाली. यावेळी उपस्थित सर्व मालेगावकर ग्रामस्थांनी गावात ‘बालविवाह’ न करण्याची सामूहिक शपथ घेतली. विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र घोडके यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
मराठी शाळा टिकल्या तरच गावचा विकास: भूषण भुमकर
आपल्या अध्यक्षीय भाषणात भूषण भुमकर म्हणाले की, “गावचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर गावातील मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.” तर प्रमुख पाहुणे डॉ. विलास काळे यांनी, “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्यास त्यांची प्रगती निश्चित होते, त्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकूण २४ गीते आणि एका मार्मिक नाटिकेचे सादरीकरण केले. चिमुकल्यांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. जाधव व श्री. सुरवसे यांनी केले, तर आभार विष्णू मस्के यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

























