जेऊर – मंगळवेढा येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या राज्यस्तरीय मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धेत इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदाची वाघीण म्हणून ओळख असलेली इंटरनॅशनल कुस्तीपटू आश्लेषा कल्याण बागडे हिने दमदार कामगिरी करत २०२६ ची महिला मंगळवेढा केसरी होण्याचा मान पटकावला.
या भव्य व चुरशीच्या कुस्ती स्पर्धेत करमाळा तालुक्याची शान असलेल्या आश्लेषा बागडे हिने प्रथमच महिला मंगळवेढा केसरी किताब जिंकून इतिहास घडवला. आपल्या उत्कृष्ट तंत्रकौशल्य, ताकद आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने एकामागोमाग एक प्रतिस्पर्धींना नमवले.
अंतिम कुस्तीमध्ये आश्लेषाने कोल्हापूरच्या नामांकित कुस्तीपटू रिंकू पाटील हिला पराभूत करत निर्णायक विजय मिळवला. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या विजयाचे स्वागत केले.
या ऐतिहासिक विजयामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना आश्लेषा बागडे हिने या विजयाचे श्रेय आपले मार्गदर्शक हनुमंत फंड, पुजाताई फंड तसेच मार्गदर्शक पै. अमित साळवे यांना दिले. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हा सुवर्णक्षणाचा टप्पा गाठता आल्याचे तिने सांगितले.
आश्लेषा सध्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे बी.ए. अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे सचिव विलासराव घुमरे, प्राचार्य माने सर तसेच क्रीडा मार्गदर्शक राम काळे यांनी तिचे मनःपूर्वक कौतुक करत पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विजयाबद्दल कुस्तीप्रेमी, प्रशिक्षक, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि विविध सामाजिक स्तरातून आश्लेषा बागडे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचा हा विजय आगामी महिला कुस्तीपटूंना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
























