टेंभुर्णी – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र. १ पिंपळनेर व युनिट क्र. २ करकंब या दोन्ही युनिटचा सन २०२५-२६ गळीत हंगाम संपल्यानंतर ऊस तोडणी-वाहतूक बिल वाहनमालकांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. आ. बबनराव शिंदे यांनी दिली. दि. १ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील ऊस तोडणी-वाहतूक बिलाची रक्कम अदा करण्यात आली असून हंगामअखेर एकूण १७८ कोटी ४४ लाख रुपये तोडणी-वाहतूक बिलासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे हंगामअखेर ऊस बिल व तोडणी-वाहतूक बिल पूर्णपणे अदा करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा एकमेव कारखाना ठरला आहे.
पिंपळनेर येथील युनिट क्र. १ कडे १५ लाख ५४ हजार ५६२ मे. टन ऊसाचे गाळप होऊन १० लाख ३३ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर करकंब येथील युनिट क्र. २ कडे ५ लाख २४ हजार ४५१ मे. टन ऊसाचे गाळप होऊन ४ लाख ८६ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशा प्रकारे दोन्ही युनिट मिळून एकूण २० लाख ७९ हजार ०१३ मे. टन ऊसाचे गाळप होऊन १५ लाख २० हजार ०५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रति मे. टन ३०२५ रुपये प्रमाणे दर देण्यात आला असून हंगामअखेर ऊस बिलासाठी एकूण ६२८ कोटी ८९ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. तसेच हंगामाच्या सुरुवातीपासून दर १० दिवसांनी ऊस बिलाचे पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा एकमेव कारखाना असल्याचेही मा. आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.
त्रिपक्षीय करारानुसार कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना जानेवारी २०२६ पासून १० टक्के पगारवाढ लागू करण्यात आली असून ती पगारात देण्यात येत आहे. तसेच सन २०२५-२६ च्या यशस्वी हंगामानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना १५ दिवसांचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
सन २०२६-२७ चा पुढील गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद व ऊस उत्पादकांनी आपल्या ऊस नोंदी कारखान्याकडे करून सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. संतोष डिग्रजे यांनी केले.
*************************
हंगामाचा आढावा
*एकूण गाळप : २०,७९,०१३ मे. टन ऊस*
*साखर उत्पादन* *१५,२०,०५० क्विंटल ऊस दर ₹३०२५ प्रति मे. टन*
*ऊस बिल अदा : ₹६२८ कोटी ८९ लाख*
*तोडणी-वाहतूक बिल : ₹१७८ कोटी ४४ लाख*
*कामगारांना : १०% पगारवाढ व १५ दिवसांचा बोनस*


























