सांगोला – अवैद्य वाळू उपसा करून वाहतुक करताना पकडलेले सहा टायर टिपर पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालय, सांगोला येथे घेवून जात असताना नेमलेल्या भरारी पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवार दि.४ मार्च रोजी पहाटे पावणे चार वाजता सांगोला तालुक्यातील कडलास येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला तालुक्यामधुन विना परवाना अवैध्यरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथका मधील सांगोला मंडल अधिकारी महेश जाधव, ग्राम महसूल अधिकारी गौरव कुंभार, वाडेगाव महसूल सेवक समाधान सुर्यगंध, मेडशिंगी महसूल सेवक सुनिल गोडसे, सरकारी वाहन चालक दिलीप काळे, खाजगी वाहन चालक रणजित देशमुख यांनी बुधवार दि.४ मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कडलास ते जवळा रोडवरील म्हसोबा मंदिरा जवळ एक विना नंबरचा पांढ-या रंगाचा सहा टायर टिपर अवैध्यरित्या शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोरडा नदिपात्रातुन चोरी करून घेवून जात असताना पकडला. त्यावरील वाहन चालक अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.
सदर टिपर पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालय, सांगोला येथे घेवून जात असताना कडलास येथे अतूल गावडे व पप्पू बिचूकले रा.दोघे जवळा, ता.सांगोला यांनी त्यांचेकडील विना नंबरची क्रेटा वाहन आडवी लावून पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून, शिवीगाळी व दमदाटी करून तेथे पडलेले दगड उचलून सरकारी वाहन क्र.एम एच.४५ एएल.८१७१ व खाजगी वाहन क्र.एम एच.४५ एयु.६७३१ यावर फेकून मारून दोन्ही वाहनाचे काचा फोडल्या. तसेच मंडल अधिकारी महेश जाधव यांना मारहाण करत सुनिल गोडसे यांना दगडाने मारहाण करून डावे हाताच्या अंगठ्याचा नख तोडून गंभीर जखमी केले. याबाबत सांगोला मंडल अधिकारी महेश जाधव यांनी अतूल गावडे, पप्पू बिचूकले रा.दोघे जवळा, ता.सांगोला व टिपर वाहनावरील अज्ञात चालक यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाणे येथे कायदेशीर तक्रार दिली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन
विना परवाना अवैध्यरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या भरारी पथकावर भ्याड हल्ला करत शासकीय वाहनाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटना शाखा-सांगोला यांच्यावतीने निषेध करत आरोपींवर तात्काळ कारवाई करावी तसेच कारवाई होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे, असे निवेदन सांगोला तहसीलदार बाळूताई भागवत यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

























